सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांचं एक अनोखंच नातं असतं. आपल्या लाडक्या सेलिब्रिटींना भेटण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी तासनतास वाट पाहत उभे असतात. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखला भेटण्यासाठीही त्याचे असंख्य चाहते प्रयत्न करत असतात. शाहरुखसंदर्भात सध्या ट्विटरवर ट्रेण्ड होणारा एक हॅशटॅग सर्वांचं लक्ष वेधतोय. कर्करोगग्रस्त अरुणा पीके यांनी अंथरुणाला खिळले असताना शाहरुखला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ट्विटरकरसुद्धा सरसावले आहेत.
अनेकदा सोशल मीडियावर मीम्सद्वारे एखाद्याची खिल्ली उडवली जाते तर कधी एखाद्याला ट्रोल केलं जातं. मात्र आता कर्करोगग्रस्त अरुणा पीके यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ट्विटरकर एकत्र आले आहेत. अरुणा यांचा अंथरुणाला खिळलेला एक फोटो आणि त्याबाजूला शाहरुखसोबत त्यांचा एक स्केच आणि #SRKMeetsAruna हा हॅशटॅग ट्विटरवर पाहायला मिळतोय. आवडत्या अभिनेत्याला एकदा भेटण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ट्विटरकर सर्व ते प्रयत्न करत आहेत.‘एसआरकेवरील प्रेमापेक्षा कोणतंच प्रेम मोठं नाही. मी त्याला भेटले तर ठीक होईन,’ असं ट्विट अरुणा यांनी केलं आहे. बॉलिवूडचा हा ‘बादशहा’ त्याच्या चाहत्यांना निराश करत नाही असं म्हटलं जातं. आता शाहरुख अरुणा यांची भेट घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.